पुणे, १० सप्टेंबर २०२२ : आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघात खेळवला गेला. यावेळी श्रीलंकन संघाने संपूर्ण सामन्यात एकहाती वर्चस्व राखत विजय मिळवला. श्रीलंका संघाने या सामन्यात उत्तम कामगिरी करत ५ विकेट्ने पाकिस्तानी संघाचा पराभव केला. पाकिस्तान संघाने सर्वबाद १२१ धावा केल्या, श्रीलंकेने पाच गड्यांच्या बदल्यात १७ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले.
श्रीलंका आणि पाकिस्ताननं दोन्ही संघानी अंतिम फेरीतील स्थान आधीच पक्क केलं होतं. त्यामुळे आजच्या या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नव्हता. दोन्ही संघांना येथे अंतिम फेरीपूर्वी आपल्या खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी होती. त्यामुळे हा औपचारीक सामना एक सराव सामना होता. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला असून श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत १९.१ षटकांत पाकिस्तानचा डाव रोखत त्यांना १२१ धावांवर रोखलं
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेचे आघाडीचे फलंदाज कुशल मेंडिस आणि दनुष्का गुनाथिलकाने खातं न खोलताच तंबुत परतले. पहिल्या फळीतील दोन फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंवर दाबाव वाढला होता. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेला धनंजया डी सिल्वा यानेदेखील निराशाच केली. तो अवघ्या ९ धावा करून झेलबाद झाला. पुढे भानुका राजपक्षे (२४) आणि पाथुम निसांका (५५ नाबाद)याने टिकून राहून अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवून दिला.
आशिया कप सुपर ४ च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला मात दिली. मात्र हे दोन्ही संघ आधीच फायनलमध्ये पोहचले होते. त्यामुळे ही फायनलची रंगीत तालीम होती. रंगीत तालमीत तरी लंकेचा डंका वाजला आहे. मात्र आशियातला टायगर कोण हे ठवणारी लढत रविवारी ११ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव