पाकिस्तान: कराचीमध्ये स्फोट, एक महिला ठार, 8 जखमी

कराची, 17 मे 2022: पाकिस्तानातील कराचीमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. येथे एमए जिना रोडवरील मेमन मशिदीजवळ स्फोट झाला असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे.

कराचीमध्ये आठवडाभरात झालेला हा दुसरा स्फोट आहे. यापूर्वी 13 मे रोजी रात्री उशिरा कराचीमध्ये बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. तर 13 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट कराचीमधील सर्वात वर्दळीचा व्यावसायिक परिसर सदरमध्ये झाला. हा स्फोट एका हॉटेलबाहेर झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. डस्टबिनमध्ये हा स्फोट झाला. बॉम्ब पेरण्यात आला होता की अन्य कोणत्या कारणाने स्फोट झाला हे स्पष्ट झाले नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या अपार्टमेंट, दुकाने, कारच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि आग लागली. स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे आठ ते दहा वाहनांनी पेट घेतला.

26 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात तीन चिनी नागरिकांचा मृत्यू

यापूर्वी 26 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये 3 चिनी आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाले. हा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा आत्मघाती बॉम्बर शरी बलोच याने केला होता. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. चीनचे पाकिस्तानमधील उपराजदूत पँग चंक्स्यू यांनी गृहमंत्री राणा सनाउल्ला यांची भेट घेतली आणि पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसह सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. चीनचे उपराजदूत चंक्सू म्हणाले – त्यांच्या देशाला कराची प्रकरणाची संपूर्ण चौकशी हवी आहे आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. यावेळी राणा सनाउल्लाह यांनी कराची हल्ल्यात मारल्या गेलेल्या चिनी नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा