पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाठवले २० हजार सैनिक

पाकिस्तान, दि. १ जुलै २०२०: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावा दरम्यान हा तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये चर्चासत्र सुरू आहे. असे असताना पाकिस्तान दुसऱ्या बाजूने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. समोर आलेल्या नवीन माहितीनुसार पाकिस्तान गिलगिट-बालटिस्तान भागात सैन्याची तैनाती करत असल्याचे समजले आहे. तर दुसर्‍या बाजूला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी चिनी लष्कराने अल बदर या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.

सध्या चीन सोबत सुरू असलेला तनाव पाहता पाकिस्तानसाठी अजूनही एक नवीन संधी असल्यासारखेच आहे. भारताला दोन मोर्चावर कसे घेराता येईल याची पाकिस्तान नेहमीच वाट पाहत असतो. यासाठी चीनचेही सहाय्य पाकिस्तानला नेहमीच मिळत आले आहे. सध्याची तणावाची स्थिती पाहता पाकिस्तानने देखील लडाखच्या उत्तरेला गिलगिट बाल्टिस्तान भागात तैनातीसाठी २० हजार अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. पूर्व नियंत्रण रेषेजवळ चीनच्या सैन्य संख्येइतकीच पाकिस्तानकडून गिलगिट-बालटिस्तान भागात सैन्य तैनाती केली जात आहे. भारताची दोन्ही बाजूंनी कोंडी करण्याचा पाकिस्तानचा हा नवीन प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून संभाव्य धोका पाहता लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत. चीनला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तान कश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्याचे सध्या दिसत आहे. आज देखील दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक सैनिक शहीद झाल्याची घटना सकाळी घडली. दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया कश्मीर खोऱ्यामध्ये वाढत आहे आणि यामागे पाकिस्तानी सैन्याचा हात आहे हे सर्वश्रुत आहे.

भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काल चुशुल येथे तब्बल दहा तास बैठक चालली. यामध्ये पूर्व लडाखमध्ये तणाव कसा कमी करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. एकीकडे भारत चीन सोबत असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूने पाकिस्तान भारताला सीमेवर तसेच कश्मीरमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांमध्ये देश कोरोनासारख्या संकटाला देखील लढा देत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा