

ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ च्या २०२५ च्या अहवालानुसार, पाकिस्तान दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित असलेला जगातील दुसरा देश बनला आहे. हा अहवाल ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस’ (आयईपी) ने प्रकाशित केला आहे. हा अहवाल जगभरातील १६३ देशांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मृत्यू, जखमी आणि त्याचा परिणाम याचा लेखाजोखा सांगतो. २०२४ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४५ टक्क्यांनी मोठी वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तान सुरक्षेच्या बाबतीत सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. या देशावर नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालण्याचे आरोप केले जातात आणि सध्या हा दहशतवाद त्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. तो केवळ एका दहशतवादी किंवा बंडखोर गटाशी नाही, तर चार वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी लढत आहे. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी), ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए), ‘इस्लामिक स्टेट खोरासान’ (आयएसके) आणि अफगाण तालिबान अशी या चार संघटनांची नावे आहेत. ‘टीटीपी’, ‘बीएलए’ आणि ‘आयएसके’ या तीन संघटना पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी घटना घडवत आहेत, तर अफगाण तालिबानवर ‘टीटीपी’ला मदत केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे पाकिस्तानची सुरक्षा तर धोक्यात आली आहेच; शिवाय देशाची अर्थव्यवस्थाही डबघाईला येत आहे. ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये ५१७ दहशतवादी हल्ले झाले होते, तर २०२४ मध्ये त्यांची संख्या १०९९ पर्यंत वाढली. ‘जीटीआय’अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये एका वर्षात एक हजारांहून अधिक दहशतवादी हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत या इस्लामिक देशाची स्थिती किती वाईट आहे, हे समजू शकते. ‘बीएलए’ने रेल्वे ओलीस ठेवल्याची घटना घडल्यानंतर पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने पुन्हा एकदा दहशतवादाविरुद्ध लढण्याचा संकल्प केला असून दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल, असे सांगितले आहे; पण गेल्या काही महिन्यांत ‘बीएलए’ फुटीरतावाद्यांनी ज्या प्रकारे ‘जाफर एक्स्प्रेस’चे अपहरण करून एकामागून एक दहशतवादी हल्ले केले, ते पाहता पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला त्यांचे लक्ष्य पार करणे सोपे दिसत नाही.
ताज्या परिस्थितीत असे दिसते, की पाकिस्तान आता बलुचिस्तानच्या अधिपत्याखाली नाही आणि तो पूर्णपणे बलुच बंडखोरांच्या ताब्यात आला आहे. याशिवाय खैबर पख्तुनख्वामध्येही परिस्थिती चांगली नाही आणि तेथे सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. १९४८ पासून स्वातंत्र्यासाठी लढणारे बलुच सैनिक पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरले आहेत. ‘टीटीपी’ ही सर्वात धोकादायक संघटना म्हणून पाकिस्तानसाठी समस्या बनली आहे. ‘जीटीआय’अहवालात २०२४ मध्ये ‘टीटीपी’ हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ९० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत, ‘टीटीपी’ने पाकिस्तानमध्ये ४८२ हल्ले केले आहेत. त्यात ५५८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हा आकडा २०११ नंतरचा सर्वाधिक आहे. अफगाणिस्तान ‘टीटीपी’ला मदत करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे; पण अफगाणिस्तानने नेहमीच असे आरोप फेटाळून लावले आहेत.
‘इस्लामिक स्टेट खोरासान’ ही अशीच एक संघटना पाकिस्तानात आपला ठसा सतत विस्तारत आहे. १८ फेब्रुवारी रोजी खैबर पख्तुनख्वामधील मदरशावर अलीकडील हल्ल्यासह अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या हल्ल्यात मौलवीसह सहा जण ठार झाले. अफगाण तालिबान या आणखी एका दहशतवादी संघटनेने पाकिस्तानवर थेट हल्ला केला नसला, तरी तिला ‘टीटीपी’चा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या गेल्या महिन्यातील अहवालात असे म्हटले आहे, की तालिबान ‘टीटीपी’ला लॉजिस्टिक आणि आर्थिक सहाय्य पुरवते. ‘टीटीपी’ आणि ‘इस्लामिक स्टेट खोरासान’ हे दोघेही चीनला आपला शत्रू मानतात. २०२४ मध्ये कराचीतील चीनी दूतावासावरही हल्ला झाला होता. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ला पाकिस्तानच्या सरकारची किंवा लष्कराची भीती नसल्याचे तिने वारंवार दाखवून दिले आहे. इतर हल्ले करण्याव्यतिरिक्त, ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीईपीसी) मध्ये काम करणाऱ्या चीनी अभियंत्यांना ‘बीएलए’ लक्ष्य करत आहे. पाकिस्तानची सद्यस्थिती पाहता या दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई न केल्यास त्याचे अस्तित्व टिकवणे फार कठीण जाईल, हे स्पष्ट दिसते. पाकिस्तान अशा ठिकाणी उभा आहे, जिथे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
देशातील महागाई आणि बेरोजगारीमुळे जनताही हैराण आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानचे एकदा विघटन झाले. येत्या काही वर्षात बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामधील परिस्थिती चिघळल्यास दक्षिण आशिया आणि जगाच्या सुरक्षेसमोर ते नवे आव्हान उभे करू शकते. पाकिस्तानातील जनतेने गेले काही दिवस दहशतीमध्ये घालवले. हे घडले कारण ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) बंडखोरांनी क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या ट्रेनचे अपहरण केले आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने मोठी कारवाई सुरू केली. आता लष्कराने सर्व प्रवाशांची सुटका केल्याचा दावा केला आहे. लष्कराने या कारवाईत ३३ ‘बीएलए’ बंडखोर मारले गेले, असे म्हटले आहे. ज्या गाडीला ओलीस ठेवण्यात आली, तिला इतिहास आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांच्या जवळचे मीर जाफर खान जमाली होते. त्यांच्या नावावरून या ट्रेनचे नाव ‘जाफर एक्सप्रेस’ ठेवण्यात आले. ही ट्रेन २० वर्षांपूर्वी सुरू झाली. ती बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा आणि रावळपिंडी दरम्यान सुरू झाली आणि नंतर ती खैबर पख्तूनख्वामधील पेशावरपर्यंत वाढवण्यात आली. ही ट्रेन १६०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करते. याच ‘जाफर एक्स्प्रेस’वर यापूर्वीही बलुच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. गेल्या वर्षी, बलुच बंडखोरांनी केलेल्या मालिका बॉम्बस्फोटांमुळे या ट्रेनचे ऑपरेशन २६ ऑगस्ट ते १० ऑक्टोबरपर्यंत थांबवावे लागले होते आणि त्याचा रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर नकारात्मक परिणाम झाला होता.
‘बीएलए’चे नाव २००० च्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झाले. तेव्हा या संघटनेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. तिच्या उपद्य्वापामुळे पाकिस्तानने २००६ मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती आणि २०१९ मध्ये अमेरिकेने तिला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले होते. ‘बीएलए’चे मजीद ब्रिगेड हे आत्मघाती पथक आहे. या पथकाचे नाव माजिद लांगोव्ह या दोन भावांच्या नावावर आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी सुरू असलेल्या बंडात या दोन भावांचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. मे १९७२ मध्ये बलुचिस्तानमध्ये ‘नॅशनल अवामी पार्टी’ सत्तेवर आली. ‘एनएपी’ पाकिस्तानमध्ये प्रादेशिक स्वायत्ततेच्या मागणीसाठी बराच काळ आवाज उठवत होती आणि १९७१ मध्ये बांगला देश वेगळे झाल्याने त्यांच्या आवाजाला बळ मिळाले; पण त्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी ‘नॅप’च्या मागणीकडे लक्ष दिले नाही; परंतु बलुच बंडखोर स्वतंत्र देशाची मागणी करत राहिले.
त्यामुळे बलुचिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळू लागली. भुट्टो यांनी १९७३ मध्ये ‘नॅप’ सरकार बरखास्त केले. यानंतर बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर आमनेसामने आले. १९७३ ते १९७७ या काळात हजारो ‘बीएलए’ सैनिक आणि पाकिस्तानी लष्कराचे अनेक सैनिक मारले गेले. माजिद लांगोव्ह सीनियर त्या वेळी तरुण होता. त्याने भुट्टो यांची हत्या करण्याचे ठरवले. २ ऑगस्ट १९७४ रोजी भुट्टो एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहण्यासाठी क्वेटा येथे आले, तेव्हा मजीद झाडावर चढून हातात ग्रेनेड धरत होता. भुत्तो यांना मारण्यासाठी तो जीव द्यायला तयार होता; मात्र माजीद लांगोव्ह सीनियर याच्या हातात ग्रेनेडचा स्फोट झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माजिद सीनियरच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, त्याचा धाकटा भाऊ माजिद लांगोव्ह ज्युनियरचा जन्म झाला. १७ मार्च २०१० रोजी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी क्वेटा येथील एका घराला वेढा घातला. या घरात बलुच लढवय्ये लपून बसले होते. घराच्या आत असलेला मजीद ज्युनियर पाकिस्तानी सैन्याशी लढला आणि मारला गेला. मजीद ज्युनियरच्या मृत्यूनंतर, बलुचिस्तानमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात आली.
कारण दोन्ही भावांनी वेगळ्या बलुचिस्तानसाठी आपले प्राण दिले होते, म्हणून दोन्ही भाऊ बलुचिस्तानमध्ये शौर्याचे प्रतीक मानले गेले. अनेक वर्षांनंतर, जेव्हा ‘बीएलए’ नेते अस्लम अचू यांनी आत्मघाती पथक तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला ‘माजीद ब्रिगेड’ असे नाव देण्यात आले. माजीद ब्रिगेडने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीईपीसी) साठी चालू असलेल्या कामात गुंतलेल्या चीनी कामगार आणि पायाभूत सुविधांना बलुच बंडखोरांनी लक्ष्य केले आहे. बलुचिस्तानचे नेते त्यांच्या प्रांताच्या मागासलेपणासाठी पाकिस्तान सरकारला दोष देतात. बलुचिस्तानची संसाधने पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लोकांनी बळकावली आहेत, असाही त्यांचा आरोप आहे. त्यातून त्यांनी पाकिस्तान लष्करालाच आव्हान दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे