कर्जाच्या पैशातून पाकिस्तान झेंडा फडकवणार, ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ५०० फूट उंच राष्ट्रध्वज

9

पाकिस्तान, १५ जुलै २०२३ : पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब राज्य सरकारने देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी ५०० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्याची घोषणा केली आहे. यासाठी सुमारे ४० कोटी पाकिस्तानी रुपयांचा खर्च येणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी बेलआऊट पॅकेज मिळाल्यानंतर पाकिस्तानने ही घोषणा केली आहे.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान लाहोर येथील लिबर्टी चौकात हा ध्वज फडकवणार आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये पाकिस्तानने अटारी-वाघा सीमेवर दक्षिण आशियातील सर्वात उंच सुमारे ४०० फुट उंच ध्वज फडकवला होता. तो पाकिस्तानमधील सर्वात मोठा होता.

IMF ने पाकिस्तानसाठी ३ अरब डॉलर बेलआउट पॅकेज मंजूर केल्यानंतर, काही दिवसांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी ही रक्कम नऊ महिन्यांत जारी केली जाईल. परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी पंजाब प्रांताला येत्या दोन वर्षांत किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे. असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर