नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे जन्मस्थळ असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानात शीख तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पेशावरमध्ये ही हत्या झाली असून रविंदर सिंग असे हत्या झालेल्या २५ वर्षीय शीख तरुणाचे नाव आहे.
नानकाना साहिब गुरुद्वारावर पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तान आणि भारतातील शीख बांधवांनी याचा तीव्र निषेध केला आहे. यामुळे दोन्ही देशातील वातावरणही चांगलेच तापले आहे. अशातच पेशावरमध्ये रविंदर सिंग या शीख तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
चमकानी पोलीस स्थानक परिसरात रविंदर याचा रविवारी मृतदेह सापडला. रविंदर मलेशियाला राहत होता. पेशावर येथे शॉपिंगसाठी आला असतानाच त्याची हत्या झाली.
नानकाना साहिब गुरुद्वारावरावर मुस्लिमांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यानंतर शीख तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली.
शीख नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या रक्षणासाठी पाकिस्तानी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी भारतीय शीख नागरिकांकडून केली जात आहे.