बीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानी घुसखोर ठार, जम्मू-काश्मीरच्या अरनियामधील घटना

7

जम्मू-काश्मीर, ३१ जुलै २०२३ : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी, रविवारी रात्री उशिरा एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घुसखोराने अरनिया सेक्टरमधील जबोवाल सीमा चौकीजवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला. बीएसएफच्या जवानांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर जवानांनी गोळीबार केला आणि त्याला ठार केले.

या घटनेची पुष्टी करताना, बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, ३० जुलै आणि ३१ जुलैच्या मध्यरात्री सतर्क दलांनी अरनिया सीमा भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) संशयास्पद हालचाली पाहिल्या. एक घुसखोर बीएसएफच्या कुंपणाकडे येताना दिसला. मात्र, सैन्याने त्याला मारले आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

या घटनेनंतर परिसराची तात्काळ नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, २५ जुलै रोजी सांबा जिल्ह्यातील रामगढ येथे बीएसएफने चार किलो उच्च दर्जाच्या हेरॉईनची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा