पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारशी नंतर राष्ट्रपतींकडून मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त

कराची, १० ऑगस्ट २०२३ : पाकिस्तानामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या सभागृहाचा पाच वर्षाचा संवैधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.

संसद बरखास्त करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. नॅशनल असेंब्लि संविधानाच्या आर्टिकल ५८ च्या नुसार भंग करण्यात आली आहे. संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरीत्या बारा ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता, असे या नोटिफिकेशन्समध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती. आर्टिकल ५८ नुसार राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार ४८ तासात संसद बरखास्त केली नाही तर ४८ तासानंतर संसद आपोआपच भंग होते.

दरम्यान, पाकिस्तानच्या संविधानानुसार संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याने तीन दिवसात हंगामी पंतप्रधानांचे नाव राष्ट्रपतीकडे सूचवायचे असते. त्यानुसार पंतप्रधान शरीफ आणि विरोधी पक्षनेत्याकडे काळजीवाहू पंतप्रधानांचे नाव सूचवण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. जर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर सहमती झाली नाही तर असेंब्लि स्पीकरद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीकडे हे प्रकरण जाते. या समितीला तीन दिवसात नव्या काळजीवाहू पंतप्रधानांचे नाव सूचवणे बंधनकारक असते.

मात्र, समितीलाही तीन दिवसात काळजीवाहू पंतप्रधानांचे नाव सूचवता आले नाही तर काळजीवाहू पंतप्रधानांच्या दावेदारांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली जातात. निवडणूक आयोग त्यावर दोन दिवसात निर्णय घेते. दरम्यान यापूर्वी पंतप्रधान शरीफ यांनी बुधवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निरोपाचे भाषण केले होते. हंगामी पंतप्रधानांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी म्हणजे आज विरोधी पक्षनेते राजा रियाज यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा