पुणे, ३० ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर- १२ फेरीतील सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानच्या संघाचा अवघ्या एक धावेनं पराभव केला. त्यामुळे आता पाकिस्तानचे भविष्य भारताच्या हाती आले आहे. यामागचे कारण म्हणजे भारताच्या सामन्यावरच पाकिस्तानच्या सेमी फायनलचे तिकीट निश्चित होऊ शकते.
आज पर्थ मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेलच, पण त्यापेक्षाही हा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जर भारत हरला तर पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात भारत जिंकणं हे पाकिस्तानच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे.
त्याचबरोबर पाकिस्तानला जर सेमी फायनल गाठायची असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांचे सामने नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. जर या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तरच त्यांचे सहा गुण होतील आणि त्याचा उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळेच पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत जाणार की नाही ते आजच्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यातून स्पष्ट होईल. त्यामुळे पाक क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव