पालघर, दि. २ मे २०२०: पालघर हत्याकांडातील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. वाडा तालुक्यात आतापर्यंत करोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.
हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास २० आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. काही आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यातील एका आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याला तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि इतर अशा ४४ जणांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीच्या संपर्कात आलेल्या अनेकांना आता तपासणीसाठी नेले जाणार असल्याची माहिती असून, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यासाठी ही चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































