पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास CBI करणार

मुंबई, ११ ऑक्टोंबर २०२२: पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून (CID) तपास सुरु होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिंदे सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

पालघरचं साधू हत्याकांड आहे काय?

पालघरमधल्या गडचिंचले या गावात चोर आणि दरोडेखोर शिरल्याची अफवा पसली होती. ज्यानंतर गावकऱ्यांनी गावाची काळजी घेण्याच्या उद्देशाने एकत्रित पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. १६ एप्रिलच्या २०२० रात्री दोन साधू आणि त्यांचा वाहन चालक यांची गाडी अडवून त्यांना जमावाने दगडाने ठेचून ठार केले होते. हे दोन साधू अंत्यसंस्कारांसाठी गुजरातमधल्या सुरतला चालले होते. त्यावेळी त्यांची विचारपूसही न करता त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली.

साधूंनाच चोर-दरोडेखोर समजून त्यांच्यावर जमावाने लाठ्या-काठ्यांनी आणि दगडफेक करत हल्ला केला. पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र हा जमाव इतका भडकला होता की त्या जमावाने पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत १०१ जणांना ताब्यात घेतले होते. यातील ९ आरोपी हे १८ वर्षांखालील होते त्यामुळे त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा