पुणे, दि. २२ मे २०२०: आषाढी वारीवर देखील सध्या कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. वारकऱ्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे की यावेळेस हि वारी होईल की नाही. याबाबत वारीतील अनेक महाराज मंडळींनी बैठका घेऊन याविषयी नियोजन देखील केले होते. आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा करण्याविषयी सरकारकडे तीन पर्याय असलेला प्रस्ताव मांडण्यात आले आहे. ४०० वारकऱ्यांसह नेहमीप्रमाणेच हा सोहळा पार पाडण्यासाठी हा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे.
मानाच्या ज्या सात पालख्या आहेत त्यातील चार पालखी सोहळा आयोजकांनी कोरोना व्हायरसचे संकट पाहता आपला पालखी सोहळा रद्द केला आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांचा प्रश्न उरला होता. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांच्या वतीने सरकारकडे तीन पर्याय असलेला प्रस्ताव देण्यात आला आहे.
कोणते आहेत तीन पर्याय
१) ४०० वारकऱ्यांच्यासह एक विणेकरी असा नेहमीप्रमाणे माऊलींच्या पादुका रथामध्ये ठेवून हा सोहळा पार पाडावा
२) १०० वारकरी आणि माऊलींच्या पादुका रथा मध्ये ठेवून हा सोहळा पार पडावा
३) पालखी सोहळ्याची ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पायी प्रवास न करता माऊलींच्या पादुका गाडीमध्ये ठेवून ३० वारकऱ्यां सह माऊलींच्या पादुका श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचवाव्यात.
यापैकी जो तिसरा पर्याय आहे तो इतर रद्द झालेल्या चार पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांनी मान्य केला आहे. आता सरकारला या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा आहे. यासह या सोहळ्याचे प्रारुप देखील सादर करण्यात आले आहे. यामध्ये वारकऱ्यांचे स्क्रिनिंग कसे केले जावे, साठ वर्षाच्या पुढील वारकरी यामध्ये नसावेत, सुरक्षित अंतर ठेवण्याविषयी काय नियम असावेत, वारकऱ्यांचे नियमित निर्जंतुकीकरण इत्यादी प्रारूप देखील सरकारकडे या प्रस्तावासोबत पाठवण्यात आले आहे. हा प्रस्ताव अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी