पंढरपूर : १जानेवारीपासून म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीपासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. असा ठराव मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला.
तसेच मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांना स्पिकरचीही आता परवानगी मिळणार नाही. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात मंदिरात साठलेली ५५ लाख रूपयांची नाणी रक्कम एचडीएफसी बँकेत ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. ही नाणी स्वीकारण्यास अन्य बँका तयार नाहीत.
आळंदीला जाताना संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला १९ नोव्हेंबरला दिवे घाटात अपघात होवून सोपान महाराज नामदास व अतुल आळशी यांचे निधन झाले होते.
मंदिर समितीच्या वतीने त्यांच्या कुटूंबाला प्रत्येकी अडीच लाख रूपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत सन २०१८-१९ च्या लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देण्यात आली.
३२ सुरक्षा रक्षक आऊटसोअर्स करून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. भक्त निवासातील तबक उद्यान, गाळे भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच संत नामदेव महाराजांची ७५० वी जयंती समितीच्या वतीने साजरी करण्याचे ठरले.
यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले शकुंतला नडगिरे उपस्थित होते.