पंढरपूर १८ जुलै २०२४ : पंढरपूर शहरामध्ये काल आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने पंढरपूर नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिलीय.
आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते. यामध्ये प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची यावर्षी संख्या जास्त होती. सफाईची वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासुनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी १५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये ३५० कायम तर ११५० हंगामी कर्मचारी काम करीत आहेत.
तसेच नदीपात्रातीलही कचरा गोळा करायचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम स्वच्छता नियंत्रणासाठी काम करीत आहे. आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ४१ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ६ टिपर, ३ कॉम्पॅक्टर, ६ डंपिंग ट्रॉली आणि जेसीबीच्या सहाय्याने दररोज अंदाजे १०० ते १२५ टन कचरा उचलण्यात येत आहे.
यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी यावेळी केले आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळुजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,नागनाथ तोडकर, अनिल अभंगराव सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिलारे