पुणे, २९ सप्टेंबर २०२३ : मुलुंडमध्ये एका मुलीला केवळ ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजातील सर्व सामान्य जनतेमधून या प्रकारावर चीड व्यक्त केली जात आहे. तर या प्रकारामुळे राजकीय वर्तुळही प्रतिक्रिया उमटल्या आहे. मनसे आणि ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तर त्यांनाही हा अनुभव आल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. आज एका मराठी मुलीची मी व्यथा पाहिली, खरंतर भाषा आणि प्रांतवादात मला पडायला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवादावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावे ठेवावी यात मी फार पडत नाही. परंतु, एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती, इथे मराठी माणसाला घर देत नाही, किंवा मराठी माणसाला सोसायटीत राहण्याची परवानगी नाही. हे धक्कादायक आहे. या मुलीसोबत जो प्रकार झाला. तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मला पण असा अनुभव आला होता. जेव्हा मला सरकारी घर सोडून नवीन घर घ्यायचे होते, तेव्हा मलाही हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला. मराठी लोकांना आम्ही घर देत नाही, असे सांगितले गेले, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे. मी कोणत्याही एका भाषेची किंवा एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचे सौंदर्य प्रत्येक भाषेने, जातीने आणि धर्माने नटलेले आहे.
मुंबई ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे.
त्यामुळे या ठिकाणी सर्वांचे स्वागत आहे. पण जर कोणी मराठी म्हणून घर देत नसेल, बिल्डिंगमध्ये प्रवेश नाकारत असेल तर ते दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला हे फार दुर्देवी आहे. या देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक भाषेच्या प्रत्येक राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची गरज काय हा माझा प्रश्न आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर