वानवडी (पुणे), २९ जुलै २०२०: गुन्हा करण्यासाठी मोठ्या गोष्टी न घडता काही क्षुल्लक गोष्टी जरी झाल्या तर तिथूनच गुन्हा होण्याच्या मार्गाचा प्रवास सुरु होतो. कोरोनाचा काळ जरी असला तरी गुन्हेगारी विश्वातील गुन्हे थांबायचं नाव घेत नाहीेत. अशीच एक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला पान टपरीवाल्या बरोबरची दादागिरी चांगलीच महागात पडली असून ते त्याच्या जीवावर बेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वानवडी पोलिसांना १० जूलै रोजी बातमी मिळाली होती की जंगल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान ९ जूलै रोजी त्याच्या पालकांनी देखील मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हा अपहरण झालेल्याच मुलाचा मृतदेह असल्याची ओळख पटली नव्हती.
पुढे खूनाचा तपास करत असताना कोंढवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांना पोलिस शिपाई किशोर वळे यांनी संबंधीत मुलाचा खून करणारे ज्या गाडीवरुन जंगलात आले होते ती गाडी महंमदवाडी येथील एका मेडिकल जवळ उभी असल्याची बातमी दिली.
संबंधीत गाडीवरुन शोध घेत रोहित, अजय, श्रीकांत आणि अक्षय या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पान टपरीचालक रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी पाहिले आरोपी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरुन संबंधीत मुलास भेटायला बोलवले असल्याचा निरोप दिला होता. यानंतर ते दोघे त्या मुलाला घेऊन महंमदवाडी येथे गेले आणि तिथे त्याला दारु पाजण्यात आली आणि त्याची निर्घुण हत्या करण्यात आली.
रोहित गौतम बनसोडे २७, अजय विजय गायकवाड २२, श्रीकांत भिमराव साठे २०, अनिल जाधव २०, अशी मुसक्या आवळण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी एका १२ वर्षाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केली आाहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी