नवी दिल्ली, २६ मार्च २०२२ : राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (NLEM) म्हणजे अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या सुमारे ८०० औषधांच्या किमती एप्रिलपासून १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) तीव्र वाढ झाल्यामुळे हे घडणार आहे.
आता ताप, जंतुसंसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार आणि अशक्तपणावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल या औषधांचा समावेश आहे.
भारतातील अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये येणाऱ्या औषधांची वार्षिक वाढ घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. या अत्यावश्यक औषधांचा किरकोळ विक्री व्यतिरिक्त सरकार आणि सरकारी आरोग्य संस्थांच्या अनेक आरोग्य कार्यक्रमांमध्ये वापर केला जातो. १ एप्रिल २०२२ पासून औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे.
यापूर्वी ७ मार्च रोजी सरकारने सांगितले की, गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई दर १३.११ टक्के होता. अशा प्रकारे, फेब्रुवारी २०२२ मध्ये सलग ११ व्या महिन्यात घाऊक महागाई दर दुहेरी अंकात राहिला. घाऊक महागाई जानेवारीमध्ये १२.९६ टक्के आणि डिसेंबर २०२१ मध्ये १३.५६ टक्के होती.
जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर १२.९६ टक्के होता. त्यापूर्वी, डिसेंबर २०२१ मध्ये, तो १३.५६ टक्के होता. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत महागाईचा दर मुख्यत्वे खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ आणि पेये यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे