मध्यप्रदेशातून जालन्याकडे येणारा गुटखा पारध पोलिसांकडून जप्त

जालना, ३१ जानेवारी २०२४ : मध्यप्रदेश राज्यातून बंदी असलेला गुटखा फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट या कारमधून जळगाव, फतेपुर, धावडा मार्गे भोकरदनकडे येणार असल्याची माहिती पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुसिंगे यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता. पोलिसांना पाहून हे गुटख्याचे वाहन न थांबविता समतानगरच्या दिशेने नेले होते. समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहने आडवी लावून, गुटख्याचे वाहन अडविण्यासाठी सतर्क केले होते. मात्र, रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटख्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवना गावाच्या दिशेने वेगाने निघाले. गुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खाजगी वाहन घेऊन गुटख्याच्या वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला. त्यांनतर हे गुटख्याचे वाहन शिवनाकडून आनवा रोडने भरधाव वेगाने निघाले. आडगाव भोंबे या गावाजवळ रस्त्यात आडवे वाहन लावून हे गुटखा वाहन मोठ्या शिताफीने पकडण्यात आले.

या वाहनांमध्ये तब्बल ३ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला शिवाय १५ लाख रुपयांची कार असा एकूण १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुटखा वाहनांच्या धडकेत धावडा येथील सतिश शेनफड मोकसरे हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी भोकरदन येथील शेख अमेर शेख बाबा आणि शेख अमेर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा