पालकांनो, मुलांची काळजी घ्या! मुंबईत पसरतेय गोवरची साथ, आतापर्यंत आठ बळी

पिंपरी-चिंचवड, १८ नोव्हेंबर २०२२ : मुंबईसह राज्यामध्ये गोवरचा संसर्ग वाढत असून, आतापर्यंत आठजणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

ही आहेत गोवरची लक्षणे

गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात.सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात. बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्णसंसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदूसंसर्ग अशी गुंतागूंत होऊ शकते.

तरी वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा असं आवाहन डॉ. नूतनकुमार सी. पाटणी यांनी केले आहे.

काय काळजी घ्याल?

आरोग्य तपासणी दरम्यान संशयित रुग्णांना ‘व्हिटॅमिन- ए’ दिलं जात आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले जात आहेत. गोवर आजाराचे निदान करण्यासाठी रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. तसंच स्वॅबद्वारेही चाचणी केली जाते. या चाचण्या महत्त्वाच्या असून गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी.

घरच्या घरी उपचार करू नये

डॉ. नूतनकुमार सी. पाटणी यांनी सांगितले, लिंबाचा पाला वापरून घरच्या घरी उपचार करू नका. काही जण गोवरच्या आजारावर उपचार म्हणून लिंबाचा पाला वापरतात किंवा लिंबाच्या पाल्यावर मुलांना झोपवलं जातं; परंतु असे कोणतेही उपचार करू नयेत. गोवरची कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार सुरू करावेत.

मुंबईतील गोवरस्थिती

  • एकूण संशयित रुग्ण : १,२५९
  • निदान झालेले रुग्ण : १६४
  • संशयित गोवर मृत्यू : ८

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा