संसद अहंकाराच्या विटांनी बनलेली नाही – राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दिल्ली, २४ मे २०२३: देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह १९ विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांनी केंद्र सरकारवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून लिहिले की, राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनासाठी आणि त्यांना समारंभासाठी निमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे. संसद ही अहंकाराच्या विटांनी बनलेली नसून संवैधानिक मूल्यांनी बनलेली असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

याआधी भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी ट्विट करून राहुल गांधींना टोला लगावला होता. शेरगिल म्हणाले होते की, राहुल गांधींनी घटनात्मक औचित्याचा सल्ला देण्यापूर्वी पक्षातील सहकाऱ्यांचा आदर करायला शिकले पाहिजे.

या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवंत मान यांनीही ट्विट करत केंद्रावर हल्लाबोल केला आहे. जेव्हा-जेव्हा संसदेचे अधिवेशन असते तेव्हा राष्ट्रपतींकडून खासदारांना निमंत्रण पाठवले जाते, मात्र यावेळी नव्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतींनाही निमंत्रण दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा