मुंबई, १ ऑक्टोबर २०२०: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलने सुरू आहेत. सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे पार्थ पवार यांनी याबाबत ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे. बीडमधील विवेक नावाच्या मराठा युवकाने आरक्षण रद्द झाल्याने केलेल्या आत्महत्यावर पार्थ पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
विवेकने केलेल्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जागे व्हावे आणि लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे असे पवार म्हणाले. बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसेच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, असेही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विवेकने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. विवेक याने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव