पुणे: पर्यावरण-हासाची समस्या मांडणारी चळवळ जगभर उभी राहात असतानाही यातून काही बदल घडेल अशी कोणतीही आशा मला दिसत नाही. देशादेशांमध्ये असलेली स्पर्धा पाहता या बाबतीत कुणी कुणाचे ऐकायचे हा प्रश्न आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपण जिथून परत फिरणे शक्य नाही अशा टप्प्यावर येऊन ठेपलो आहोत. मृत्यूशय्येवरील रुग्णाचे उर्वरित आयुष्य तरी सुसह्य जावे अशी इच्छा करण्यासारखीच ही स्थिती आहे.”, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशनातर्फे आयोजित कार्यक्रमात अतुल देऊळगावकर लिखित ‘ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मनोविकास प्रकाशनातर्फे आयोजित कार्यक्रमात अतुल देऊळगावकर लिखित ‘ग्रेटाची हाक- तुम्हाला ऐकू येतेय ना’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल कुलकर्णी बोलत होते. मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक अरविंद पाटकर, आशिष पाटकर या वेळी उपस्थित होते. स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्ग या मुलीने पर्यावरणरक्षणाच्या जनजागृतीसाठी उभ्या केलेल्या जागतिक चळवळीची कहाणी या पुस्तकात आहे.
अतुल कुलकर्णी म्हणाले, ”पर्यावरणाच्या बाबतीत प्रत्येकाने आशावादी असायलाच हवे असे नाही, पण अस्वस्थ मात्र असायला हवे, असे म्हणणा-या ग्रेटाच्या शब्दाशब्दांत उद्विग्नता दिसते. या स्थितीत जग बदलायचे असेल तर काही नियम तत्काळ बदलावे लागतील. ‘आमचे चुकले’ हे मान्य करून चूक सुधारण्याची वेळ आता आली आहे. आपल्या जगण्याच्या व्याख्या आतापर्यंत दुस-यांनी ठरवल्या. माणसाची यशस्वितता मोजण्यासाठी आपल्याला त्याची दिखाऊ संपत्ती महत्त्वाची वाटते. या सगळ्या व्याख्या आणि आपला बेदरकारपणा पर्यावरण-हासाच्या मुळाशी असून ते आता बदलण्याची गरज आहे. हा सगळा निराशावाद नव्हे, तर खोट्या आनंदाच्या वातावरणात ‘रिअलिटी चेक’ची वेळ आली आहे.”
”ग्रेटा थुनबर्ग असो किंवा मलालासारखी कार्यकर्ती असो. एक प्रकारे या मानवाच्या प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर जन्मलेल्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. त्यांच्या वयाकडे दुर्लक्ष करून त्यांचे म्हणणे आदराने ऐकण्याची व त्याची दखल घेण्याची गरज आहे.”, असेही कुलकर्णी म्हणाले.
गवाणकर म्हणाल्या, ” खूप पूर्वीपासून अनेक कार्यकर्त्यांनी पर्यावरण-हासाच्या बाबतीत आर्त हाक दिली होती आणि पुढचे धोके अभ्यासपूर्णरित्या दाखवून दिले होते. मात्र त्या हाकांना म्हणावी तशी साद मिळाली नाही. पर्यावरणरक्षणासाठी कृतीशील होऊन स्थानिक पातळीपासून प्रयत्न सुरू करायला हवेत आणि कृती करणा-यांच्या मदतीला जायला हवे.”
”आपली जीवनशैली आणि आपल्या मागण्या यांबाबत विचार करण्याची गरज ग्रेटाच्या कृतीतून समोर आली आहे. जगातील प्रदूषण नेमके कोण करते, तेल आणि कोळसा कंपन्या प्रदूषणासाठी कशा जबाबदार आहेत आणि ठिकठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीत लोकांचा सरकारांवरील विश्वास उडून ते न्यायालयात कसे धाव घेऊ लागले आहेत, ही स्थिती या लढ्याच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.”, असे अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.
अरविंद पाटकर यांनी आपल्या मनोगतातून ग्रेटाच्या हाकेला ओ देत पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारायला स्वतःपासून सुरूवात करावी असे आवाहन केले.