नवी दिल्ली, दि.११मे २०२०: सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व सेवा सुविधा, उद्योग धंदे बंद आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून १२ मे पासून टप्याटप्याने या पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
११ मे म्हणजे आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून नागरिकांना IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीटांचे बुकिंग करता येईल. तिकिट बुकिंगसाठी नागरिकांनी लॉगइन करावे.
सुरुवातीला रेल्वेकडून ३० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणं बंधनकारक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जर प्रवाशांमध्ये संक्रमणाचे कोणतेही लक्षण जाणवले, तर मात्र अशा प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.
तसेच रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार , दिल्लीतून १५ रेल्वे सुरू होणार असल्याचे समोर येत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर कोणतेही तिकीट मिळणार नसल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तिकीट फक्त ऑनलाइन पद्धतीनेच काढता येणार आहे. या ट्रेन दिल्लीतून पाटणा, मुंबई, अहमदाबाद, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, सिकंदराबाद, बंगळुरू, मडगांव या स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. अशी माहितीही स्पष्ट करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: