पुणे, ३० नोव्हेंबर २०२२ : पुण्यातील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर आज ‘एनडीएची पासिंग आऊट परेड’ होत आहे. मैदानाला द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचे नाव देण्यात आले असून त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शकरगडच्या रणांगणात बसंतरच्या लढाईत ते शहीद झाले होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ( NDA ) १४३ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आऊट परेड ( POP ) बुधवारी सकाळी खडकवासला, पुणे येथे सुरू झाली. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख ऍडमिरल आर.के. हरिकुमार उपस्थित होते.
एनडीएची पासिंग आऊट परेड ही अकादमीतील तीन वर्षांच्या दीर्घ आणि कठोर प्रशिक्षणाचा कळस आहे.
वर्षातून दोनदा भारताच्या प्रमुख लष्करी अकादमीतून नवीन अधिकारी तयार होतात. NDA मधून उत्तीर्ण झाल्यानंतर, कॅडेट्स त्यांच्या संबंधित सशस्त्र सेना अकादमीमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षणासाठी आणखी एक वर्षासाठी जातात.
यावेळी नौदल प्रमुखांनी कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, कॅडेट्सना संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्ही येथून बाहेर पडलात की, तुमची ओळख अशा जगाशी होईल की, जिथे युद्ध आणि शांततेच्या साध्या व्याख्या नसतील. तर असे जग असेल ज्यामध्ये पारंपारिक युद्धाचा धोका अजूनही अस्तित्वात आहे. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या प्रगत आणि गुंतागुंतीच्या सुरक्षा यंत्रणेचाही अभ्यास करणे आवश्यक असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड