मुंबई, १० ऑगस्ट २०२०: आयपीएलच्या १३ व्या सत्रातून विवोला काढून टाकल्यानंतर लीगसाठी नवीन प्रायोजकांसाठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे योगगुरू बाबा रामदेव यांची आयुर्वेद कंपनी पतंजली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगाम १३ च्या शीर्षक प्रायोजकतेसाठी बोली लावण्याचा विचार करीत आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही निवेदन आले नाही.
पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजारावाला यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही यावर विचार करीत आहोत. हे स्थानिकांसाठी आणि भारतीय ब्रँडला जागतिक करण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. आम्ही यात लक्ष घालतोय. ‘ तथापि, पतंजली ने अद्याप या विषयावर अंतिम निर्णय बाकी असल्याचे तिजारावाला यांनी सांगितले.
आयपीएल २०२० च्या मोसमातील नवीन शीर्षक प्रायोजकांच्या शोधात बीसीसीआय आज निविदा प्रसिद्ध करू शकते. विव्होच्या निघून गेल्यानंतर जिओ, ॲमेझॉन, टाटा ग्रुप, ड्रीम ११ आणि बायजूस या कंपन्यांनी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वात रस दर्शविला आहे. बीपीसीआय आयपीएल -१३ च्या नवीन प्रायोजकांसाठी संपूर्ण पारदर्शकता आणि प्रक्रियेचे अनुसरण करेल.
भारत चीन सीमा तनावानंतर देशात सर्वत्रच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. विवो ही देखील एक चीनी कंपनी आहे त्यामुळे या कंपनीला देखील आयपीएल मधून यावर्षी वगळण्यात आले आहे. केवळ या वर्षापुरतेच विवोला वगळण्यात आले आहे. विवोने २०१८ ते २०२२ पर्यंत पाच वर्ष २१९० कोटी रुपये (प्रत्येक वर्षी ४४० कोटी रुपये) साठी आयपीएल शीर्षक प्रायोजकत्व अधिकार संपादन केले. पुढच्या वर्षी विवोचे मुख्य प्रायोजक म्हणून परत येऊ शकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी