मुंबई, दि. २८ जुलै २०२० : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्यांनाही आता या योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेता येणार आहेत. तसा शासनने निर्णयच जारी केला आहे. यावेळी आरोग्य विभागाने बिलाबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
त्यात महत्वाचे म्हणजे या पुढे खासगी रुग्णालयाने कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचे बिल आकारतांना बेडचे बिल हे चार हजार प्रति दिन प्रमाणे ७ दिवसांचे केवळ २८ हजार एवढेच बिल आकारावे असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी लागणारे पीपीई किट आणि मास्क पुरवण्याची जबाबदारी त्या त्या रुग्णालयाची असेल असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल हे त्यांना मिळणाऱ्या पॅकेज पेक्षा अधिक होत आहे. त्यामध्ये बेडचे बिल हे अव्वाच्या सव्वा लावल्याचे देखील समोर आले होतं. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.या योजने अंतर्गत राज्यातील ८५ टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाचा उद्रेक पाहता आता उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील १०० टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यालाही आता मुदतवाढ दिल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शनिवारी हा शासन निर्णय जाहीर झाला.
कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभुमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या ९९५ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
आरोग्य विभाग महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बेडच्या बिलाबाबत बाबत दर निश्चित केले असले तरी कोरोनावर उपचारासाठी लागणारी महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी