पाटणा, बिहार २३ जून २०२३: लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापली समीकरणे तयार करून राजकीय आघाड्या बांधण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी एकजुटीसाठी आज २३ जून रोजी, बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. मात्र पंतप्रधान मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी उतरलेल्या विरोधी पक्षांची राजकीय ताकद काय आहे?आणि भाजपला पराभूत करण्यासाठी ते एकत्र कसे येतील, हा मोठा प्रश्न आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपविरोधात विरोधी एकजुटीची मोहीम हाती घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली १६ विरोधी पक्षांचे प्रमुख पाटणा येथील बैठकीत सहभागी होतायत. काँग्रेस, आरजेडी, जेडीयू, जेएमएम, सपा, शिवसेना, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डीएमके, टीएमसी, सीपीआय, सीपीआय-एमएल, सीपीएम आणि आम आदमी पार्टी या बैठकीत सहभागी होत आहे. अशाप्रकारे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे राजकीय पक्ष विरोधी एकजुटीच्या मिशनमध्ये सामील होत आहेत. परंतु सर्वांचा स्वतःचा राजकीय अजेंडा आहे.
विरोधी पक्षांची एकजूट करण्यात नितीश कुमार यशस्वी ठरले तर ते जवळपास ४५० जागांवर भाजपशी वन-टू-वन लढत करू शकतात. विरोधी छावणीत उभ्या असलेल्या प्रादेशिक पक्षांकडे ज्या राज्यांमध्ये त्यांचा राजकीय पाया आहे अशा १० राज्यांमध्ये २६९ संसदीय जागा आहेत, परंतु त्यापैकी ३८ जागांवर काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा आहे. अशा प्रकारे, २३१ जागांवर प्रादेशिक पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विरोधात आपले नशीब आजमावत आहेत.
काँग्रेस आणि विरोधी पक्षांची राजकीय ताकद पाहता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून ते कसे रोखू शकतील, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी भाजप विरुद्ध वन टू वन लढत व्हायला हवी, या सूत्रावर विरोधक पुढे जात असून, त्यासाठी विरोधकांना एकत्रितपणे ४७५ जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. मात्र, त्यासाठी काँग्रेस अद्याप तयार झालेले नाही.
काँग्रेस राष्ट्रीय पक्ष म्हणून किमान ३०० जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय, तर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने केवळ २२५ जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्याचप्रमाणे, प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आपापल्या राज्यात फारशा राजकीय जागा देण्याच्या मन:स्थितीत नाहीत, तर काँग्रेसला वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुकांसाठी त्यांना जागा द्यायच्या आहेत. विरोधी एकजुटीत अनेक अडचणी असून गुंतागुंतीची समीकरणे आहेत, त्यामुळे ते भाजपशी टक्कर कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड