पिंपरी, १८ ऑगस्ट २०२३ : मावळ तालुक्यातील पवना धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत ९८ टक्के पाणी जमा झाले आहे. त्यामुळे लवकरच धरण १०० टक्के भरण्याचे सकारात्मक चिन्ह दिसत आहे. मात्र पावसाचा जोर संथ झाल्याने धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. शहरात पवना नदी पात्रातील पाणी आकसले असून, पात्र संथ गतीने वाहत आहे. गेल्या आठवड्यात धरण ९३ टक्के भरले होते. धरणातून त्या दिवसांपासून १.४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तो दोन ते तीन दिवस कायम होता. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात ९८ टक्के पाणीसाठा होता. धरणात ८.२९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात रविवारपर्यंत ९६ टक्के पाणीसाठा होता. दिवसभरात केवळ २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत धरणात धरण क्षेत्रात तब्बल २.१०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरण ९७.१२ टक्के भरले होते. तर एकूण २.८०९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर