Demand to Protect Rivers and Stop Deforestation: पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या पात्रातील वृक्षतोड थांबवण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी विधानभवनात फलक झळकावून जोरदार आंदोलन केले. शहरातील नदी विकास प्रकल्पालाही त्यांनी यावेळी कडाडून विरोध दर्शविला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात प्रवेश करताना आमदारांनी हातात ‘पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे’ असे फलक घेतले. ‘आधी नद्या स्वच्छ करा, नद्या वाचवू आणि निसर्ग टिकवू’ अशा घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पाचशेहून अधिक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन पर्यावरण संरक्षणासाठी शहरभर मानवी साखळी तयार केली होती. या मानवी साखळीतून महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला गेला आहे. शहरातील पर्यावरणवादी संघटनांच्या ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी नद्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.


“शहरातील पर्यावरणवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार करूनच विकास करायला हवा. नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित राखणे गरजेचे आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्याकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे आम्हाला मान्य नाही,” असे आमदार गोरखे यांनी ठामपणे सांगितले.
शहरातील नदी विकास प्रकल्पाला पर्यावरणवादी संस्थांचा मोठा विरोध होत आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील नदी विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. नदीकाठची नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता जपण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. नद्यांच्या पात्रातील वृक्षतोड थांबवून नदीकाठचे नैसर्गिक सौंदर्य जपणे आवश्यक आहे. नद्यांच्या काठावर विविध प्रकारचे वृक्ष आणि वनस्पती आढळतात, ज्यामुळे परिसरातील जैवविविधता टिकून राहते. वृक्षतोडीमुळे हे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असून, पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे