गोल पोस्ट महाराष्ट्र पवन मावळातील संतापलेल्या नागरिकांचा अनोखा ‘सत्कार’ महावितरण कार्यालयाला टाळे!

पवन मावळातील संतापलेल्या नागरिकांचा अनोखा ‘सत्कार’ महावितरण कार्यालयाला टाळे!

नागरिकांचा अनोखा 'सत्कार' महावितरण कार्यालयाला टाळे!

Pawan Maval villagers protest against MSEDC : गेल्या महिनाभरापासून अंधारात चाचपडणाऱ्या पवन मावळ परिसरातील ४२ गावांमधील संतप्त नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. सततच्या तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी चक्क महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आणि उपहासात्मकपणे अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व हार घालून ‘सन्मान’ केला. “वीज देता का वीज?” असे म्हणत झोपेचे सोंग घेणाऱ्या महावितरणला नागरिकांनी जागे केले, तसेच वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

गेल्या महिनाभरापासून पवन मावळ भागातील ४२ वाड्या-वस्त्यांवर विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचे संसार अंधारात खितपत पडले असून, त्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी ‘कुंभकर्ण झोपेत’ असल्याने नागरिकांनी हा अभिनव पवित्रा घेतला. “तुम्हाला वीज देता येत नसेल, तर चला तुमचा सत्कार तरी करूया!” असे म्हणत त्यांनी महावितरणच्या काले कॉलनी येथील कार्यालयात धडक दिली.

यावेळी कार्यालयातच अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे चित्र दिसले. शाखा अभियंता अमय रामगिरी यांनी कर्मचारी परशुराम खोपडे यांना तात्काळ कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असता, खोपडे यांनी “तुम्ही करा काम, मी नाही करणार!” असे उद्दामपणे उत्तर दिले. हेच महावितरणचे भीषण वास्तव असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, शाखा अभियंता अमय रामगिरी यांनी, “मी गेल्या दहा दिवसांपूर्वीच या कार्यालयात रुजू झालो असून, झालेल्या तक्रारींचे निवारण आठवडाभरात करेल,” असे आश्वासन दिले. मात्र, स्थानिक नागरिक अतुल कालेकर यांनी महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. वीजपुरवठा व्यवस्थित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version