पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनात सामान्य प्रशासन विभागाने मोठा बदल करत विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे खाते बदल आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे महत्त्वाच्या विभागांची धुरा आता नवीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे.
महापालिकेत निवडणूक व जनगणना तसेच कर आकारणी व संकलन अशा दोन महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळणारे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली नागपूर येथे झाल्याने प्रशासनात ही मोठी पोकळी निर्माण झाली होती.
या बदलानुसार, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे (क्रीडा विभागासह) आता कर आकारणी व संकलन विभागाचा महत्त्वाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे महसूल संकलनाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
दुसरीकडे, आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत अभियान विभागाचा कार्यभार पाहणारे उपायुक्त सचिन पवार यांना आता निवडणूक व जनगणना विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरी सुविधा केंद्राचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे (नागरी सुविधा केंद्रासह) आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत अभियानचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने हे महत्त्वपूर्ण बदल केले असून, या खांदेपालटामुळे प्रशासकीय कामांना नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे










































