पिंपरी-चिंचवड निवडणुकीचं बिगुल! ‘या’ २० प्रभागांत अनुसूचित जातीचं आरक्षण, इच्छुकांचे धाबे दणाणले!

महापालिका निवडणुकीच्या (PCMC Election) प्रारूप प्रभाग रचना निश्चित होताच सर्वांचे लक्ष आता आरक्षणावर गेले आहे. एकूण १२८ सदस्यांपैकी २० प्रभागांमध्ये अनुसूचित जातीचे (SC) आरक्षण राहणार असून, त्यापैकी तीन प्रभागांमध्ये अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षणही असेल. यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांचे राजकीय गणित बदलले आहे. विशेषतः चिंचवडेनगर (प्रभाग १६) आणि दापोडी (प्रभाग ३०) येथील सर्वसाधारण गटातील इच्छुकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय ३२ प्रभाग असून एकूण १२८ सदस्य असणार आहेत. आरक्षणाची आकडेमोड संबंधित प्रभागातील मतदारसंख्येवर आधारित आहे. सर्वाधिक मतदारसंख्येच्या उतरत्या क्रमाने हे आरक्षण लागू केले जाते. या वेळेस १२८ जागांपैकी २० जागा SC आणि ३ जागा ST प्रवर्गासाठी आरक्षित असतील.

SC आणि ST दोन्ही आरक्षित प्रभाग:

  • प्रभाग ४: दिघी
  • प्रभाग २९: पिंपळे गुरव
  • प्रभाग ३०: दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी

प्रभाग रचनेत बदलाचे परिणाम:
प्रभाग क्रमांक २४ (पदमजी पेपर मिल) फोडल्यामुळे येथे SC आरक्षण कमी झाले आणि ते प्रभाग १६ (चिंचवडेनगर) येथे गेले आहे. याचा परिणाम भाजपचे नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे आणि शेखर चिंचवडे यांच्यासारख्या नेत्यांवर होण्याची शक्यता आहे. पूर्वी येथे OBC आणि सर्वसाधारण गटासाठी जागा होत्या.

तसेच, प्रभाग क्रमांक ६ (धावडे वस्ती) फोडल्यामुळे ST आरक्षण कमी होऊन ते प्रभाग ३० (दापोडी) मध्ये गेले आहे. यामुळे दापोडीतील सर्वसाधारण गटातील इच्छुकांचे राजकीय नशीब धोक्यात आले आहे, विशेषतः काटे बंधूंची राजकीय वाटचाल आता कठीण झाली आहे.

संपूर्ण शहरातील राजकीय उत्सुकता:
आरक्षण सोडत आता कोणाचे नशीब उजळेल आणि कोणाला घरी बसवले जाईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रभाग रचनेतील बदल हे PCMC निवडणुकीच्या राजकीय समीकरणांसाठी गेम चेंजर ठरत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे