पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक! प्रभागनिहाय मतदार यादी आज प्रसिद्ध

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी! प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज, गुरुवार (दि. २० नोव्हेंबर) रोजी प्रसिद्ध होणार आहे. मतदारांना ही यादी पाहण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय, ही यादी इच्छुकांसाठी विक्रीसाठीही उपलब्ध असेल.

महापालिकेच्या मतदार यादी कक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघांमधील याद्यांचे विभाजन करून ही प्रभागनिहाय यादी तयार केली आहे. १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचीच नावे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर नोंदणी केलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सूचना व हरकती लेखी स्वरूपात सादर करता येतील. हरकतींवर निर्णय झाल्यानंतर ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, ८ डिसेंबरला मतदान केंद्रांच्या ठिकाणांची आणि १२ डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यादीवरील हरकती गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर, तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक विभागाने ही यादी राज्य निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीवर अपलोड केल्याने, तिच्या प्रसिद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मतदार यादी कार्यक्रम

  • प्रारूप यादी प्रसिद्ध: २० नोव्हेंबर
  • सूचना/हरकती स्वीकारणे: २० ते २७ नोव्हेंबर
  • अंतिम यादी प्रसिद्ध: ५ डिसेंबर
  • मतदान केंद्र ठिकाण यादी: ८ डिसेंबर
  • मतदान केंद्रनिहाय यादी: १२ डिसेंबर

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे