पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक गणेशोत्सव आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आता ऑनलाइन पद्धतीने मिळवणे सोपे झाले आहे. महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सलग तिसऱ्या वर्षीही सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
केवळ महापालिका क्षेत्रातीलच नव्हे, तर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि तळेगावसह विविध भागांतील मंडळांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. परवाना मिळवण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर ‘गणेशोत्सव मंडप परवानगी २०२५’ या लिंकवर स्वतःचे खाते तयार करणे आवश्यक आहे. यासाठी मोबाइल नंबर आणि ओटीपीद्वारे प्रमाणीकरण केले जाते.
ऑनलाइन अर्ज करताना मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचे फोटो व संपर्क क्रमांक तसेच गणेशोत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा तपशील द्यावा लागतो. यामध्ये गणेश स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील वाहने आणि विद्युत रोषणाईची माहितीही समाविष्ट असते.
या प्रणालीमुळे महापालिका क्षेत्रीय कार्यालयांकडून मिळणारे ‘ना हरकत दाखले’ आणि त्यानंतर पोलीस आयुक्तालयाकडून मिळणारी अंतिम परवानगीची प्रक्रिया जलद झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ‘या प्रणालीचा मुख्य उद्देश गणेश मंडळांना दोन्ही कार्यालयांचे ना हरकत दाखले लवकरात लवकर मिळवून देणे हा आहे.’ याबरोबरच, गणपती मूर्तीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सोयही सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे.













































