मोशीत उभारले जातेय ७०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय पिंपरी-चिंचवडच्या आरोग्याला मिळणार नवी दिशा!

PCMC 700 Bed Hospital Construction in Moshi
मोशी,पिंपरी-चिंचवड

PCMC 700 Bed Hospital Construction in Moshi: पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्य सेवेत क्रांती घडवणाऱ्या मोशी येथील ७०० खाटांच्या भव्य रुग्णालयाचे बांधकाम वेगाने सुरू आहे! डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या ३४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या रुग्णालयाच्या आठ मजल्यांपैकी तिसऱ्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून, नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मोशीतील १५ एकर जागेपैकी अडीच एकर क्षेत्रावर ५७ हजार ४५० चौरस मीटरचे हे रुग्णालय आकार घेत आहे. सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी हे रुग्णालय एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरणार आहे. या परिसरात भविष्यात २०० खाटांचे कर्करोग रुग्णालय, १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि निवासी इमारती उभारण्याचीही योजना आहे.

रुग्णाल्याची वैशिष्ट्ये: आरोग्याचा नवा मापदंड

मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले की, मोशीतील हे रुग्णालय पिंपरी-चिंचवडच्या आरोग्यदृष्ट्या शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. हे रुग्णालय केवळ खाटांची संख्या वाढवणार नाही, तर अत्याधुनिक आणि पर्यावरणस्नेही सुविधांनी युक्त असेल.

प्रमुख वैशिष्ट्ये;

  • अतिदक्षता विभाग: साठ खाटा विशेषतः अतिदक्षता विभागासाठी राखीव असतील.
  • आधुनिक सुविधा: आपत्कालीन सेवा, बाह्यरुग्ण विभाग (OPD), रेडिओलॉजी, बालरोग, स्त्रीरोग, आयसीयू, डायलिसिस आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यांसारख्या सर्व आधुनिक सुविधा इथे उपलब्ध असतील.
  • पर्यावरणस्नेही रचना: हे रुग्णालय सरकारी नियमांनुसार मानांकनासाठी पात्र असून, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, २०० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सेंद्रिय कचरा प्रक्रिया यंत्रणा यांसारख्या सुविधांनी सुसज्ज असेल.
  • अग्निसुरक्षा: अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन मार्गाची सोय असेल.
  • पार्किंग: २७४ चारचाकी आणि २५० दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असेल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम प्रगतिपथावर असून, हे रुग्णालय शहरातील आरोग्य सेवेची गुणवत्ता निश्चितच वाढवेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे