गोल पोस्ट महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवकची कंबर, पवारांकडून नव्या चेहऱ्यांना संधीचे संकेत!

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवकची कंबर, पवारांकडून नव्या चेहऱ्यांना संधीचे संकेत!

NCP Youth prepares for Pimpri-Chinchwad elections with Sharad Pawar

NCP Youth prepares for Pimpri-Chinchwad elections with Sharad Pawar: आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत, शहरातील युवक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा केली. यावेळी, केवळ युवकांनाच नव्हे, तर महिला आणि विद्यार्थ्यांनाही निवडणुकीत संधी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

पुण्यात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला ज्येष्ठ नेते प्रकाश मस्के, अरुण पवार, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, रजनीकांत गायकवाड, प्रशांत जाधव आणि उद्योजक तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत, पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठापूर्वक काम करणाऱ्या युवक पदाधिकारी, महिला, विद्यार्थी आणि इतर संलग्न संघटनांमधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची मागणी पवारांकडे करण्यात आली.

यावेळी शरद पवार यांनी, पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जागा लढवण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, यंदाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसतील, असे स्पष्ट संकेत दिले. पक्ष संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी आणि युवकांना अधिक संधी दिली जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांनी युवकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या भेटीमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version