पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; सहायक आयुक्तांच्या बदल्या जाहीर, तर भांडारपाल अडचणीत!

Officer Shuffle in PCMC
महापालिकेत प्रशासकीय फेरबदल;

Officer Shuffle in PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्ग ‘अ’ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत, ज्यामुळे विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यासोबतच, महापालिकेच्या एका भांडारपालाला फसवणुकीच्या आरोपाखाली ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नवीन आदेशानुसार, सहायक आयुक्त अमित पंडित यांच्याकडे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासह माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, सहायक आयुक्त अतुल पाटील यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासोबत अतिक्रमण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, जी यापूर्वी सहआयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे होती.

सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडे ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय विभाग कायम ठेवण्यात आला आहे. सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा कार्यभार काढून त्यांना आता शिक्षण विभागाची जबाबदारी दिली गेली आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाची जबाबदारी आता सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय, सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडील उद्यान विभागाची जबाबदारी काढून त्यांना अग्निशमन विभागाचे काम देण्यात आले आहे.

भांडारपालास १२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी नोटीस!

एकीकडे प्रशासकीय बदल्या सुरू असतानाच, दुसरीकडे महापालिकेत एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल बुधा ढवळा दाभाडे यांच्याविरोधात १२ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे प्राप्त झाली होती. निगार दस्तगीर आतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भांडारपाल दाभाडे यांनी महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत, आयुक्त शेखर सिंह यांनी भांडारपाल दाभाडे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे