पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कृती आराखड्यात देदीप्यमान यश! गुणवत्तापूर्ण सेवांच्या बळावर राज्यामध्ये द्वितीय क्रमांक.

18
PCMC Ranks Second in the State in Terms of Quality Services
PCMC चा राज्यामध्ये द्वितीय क्रमांक;

PCMC Ranks Second in the State in Terms of Quality Services: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमाच्या अंतिम मूल्यमापनात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या कठोर मूल्यमापनात महापालिकेने १०० पैकी तब्बल ८५.७१ गुण प्राप्त केले आहेत.

राज्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा आणि नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धती आणण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने मूर्त स्वरूप दिले आहे. महापालिकेने डिजिटल प्रशासन, अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास, शहराची स्वच्छता आणि नागरिकांना तत्पर सार्वजनिक सेवा पुरवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. या अद्वितीय कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दहा महत्त्वाच्या निकषांवर आधारित मूल्यांकन;

मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कृती आराखड्यात राज्यातील तब्बल ४८ विविध शासकीय विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. अंतिम टप्प्यात, क्यूसीआयने कार्यालयांच्या संकेतस्थळांची सुलभता, कार्यालयीन पायाभूत सुविधांची गुणवत्ता, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा, नागरिकांसाठी निवास सुलभता, गुंतवणूक वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यांसारख्या १० महत्त्वपूर्ण निकषांवर कसून मूल्यांकन केले. या मूल्यांकनात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वोत्तम महापालिका आयुक्त, सर्वोत्तम पोलिस आयुक्त, सर्वोत्तम विभागीय आयुक्त आणि सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक किंवा उपमहानिरीक्षक अशा विविध श्रेणींनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची निवड करण्यात आली.

या यशाबद्दल बोलताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “राज्यातील सर्वोत्तम महानगरपालिकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे. आगामी काळात, आम्ही महानगरपालिकेच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बनवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊ.” सर्वोत्तम महापालिका आयुक्त श्रेणीत प्रशासक शेखर सिंह यांनी देखील द्वितीय क्रमांक पटकावून दुहेरी आनंद दिला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवले, ज्यामुळे त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. यात सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि रिअल-टाईम माहिती देणारे अद्ययावत संकेतस्थळ तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) तक्रार निवारण प्रणाली विकसित करणे, भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित मालमत्ता कर सुधारणा लागू करणे, नागरिकांसाठी स्मार्ट सेवा सुविधा उपलब्ध करणे, शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि नागरी सेवांच्या प्रतिसादाचा वेळ सुधारण्यासाठी अंदाजाधारित विश्लेषण प्रणालीचा वापर करणे यांसारख्या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे