पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागात झालेल्या नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाजाची चौकशी होऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याने मोठा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडला आहे. यामुळे करसंकलन विभागातील गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे.
या गैरप्रकारांची दखल घेत, आयुक्त शेखर सिंह यांनी मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले आणि तत्कालीन सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली एक त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने ५४ हून अधिक प्रकरणांची सखोल तपासणी केली. चौकशीनंतर समितीने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यासाठीची फाइल करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्तांकडे देण्यात आली होती.
मात्र, एक वर्ष होऊनही या घोटाळेबाजांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सामान्य प्रशासन विभागाने २६ जून २०२५ रोजी करसंकलन विभागाला तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते, पण या पत्राकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या संदर्भात, महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी १९ सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत तीन वेळा पत्रव्यवहार करूनही अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली आहे. यावरून करसंकलन विभागातील कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































