“एक कोटी”ची मर्यादा टाळत २६२ कोटींची कामे! चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह: अतिरिक्त आयुक्तांकडून ‘अनावश्यक’ कामांचा सपाटा!
पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) अतिरिक्त आयुक्तांनी ‘एक कोटी’ रुपयांच्या आतील कामांच्या अधिकारांचा चातुर्याने वापर करत तब्बल २६२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची कामे मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेत एक कोटी रुपयांवरील कामांसाठी आयुक्तांची मंजुरी आवश्यक असते, ही अट टाळण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी एकाच मोठ्या कामाचे अनेक लहान ‘पॅकेज’ (एक कोटीपेक्षा कमी रकमेचे) केले आणि स्वतःच्या अधिकारात निविदा प्रक्रिया राबविल्या. गेल्या वर्षभरात (२०२४-२५ या आर्थिक वर्षात) विविध विभागांमधील ‘अनावश्यक’ कामांसाठी अशा ७९८ निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

या कामांची एकूण रक्कम रु. २६२ कोटी १५ लाख २८ हजार ७३० इतकी आहे. यात सर्वाधिक कामे स्थापत्य (२९८ निविदा), विद्युत (२२७ निविदा) आणि पाणीपुरवठा (१०४ निविदा) विभागांमध्ये झाली आहेत.

नुकतेच, उद्यान विभागात ५ कोटी रुपयांचे खेळाचे साहित्य खरेदी करण्याचे काम देखील पाच पॅकेजमध्ये विभागून अतिरिक्त आयुक्तांनी मंजूर करून घेतले.
आम आदमी पक्षाने (आप) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, ठेकेदारांना पोसण्याचे काम प्रशासनाने केल्याचा आरोप केला आहे.

एका अतिरिक्त आयुक्तांना नगरविकास विभागाच्या आदेशानंतरही निवडणूक कामाच्या नावाखाली महापालिकेत थांबवण्यात आले आहे, हे विशेष. शेकडो कोटींच्या निविदा प्रक्रियांच्या जोडीला, एका विशिष्ट मर्यादेच्या आतील निविदा काढून प्रशासकीय आणि आर्थिक शिस्त मोडल्याबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे