पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकेत मोठी घट झाल्याने बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत. अनेक भाज्यांनी शंभरी ओलांडल्यामुळे सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. किरकोळ बाजारात काही भाज्यांचे दर तर दुप्पट झाले आहेत.
मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक ४ हजार ७१७ क्विंटल तर पालेभाज्यांची आवक ३७ हजार ५०० जुड्या इतकी नोंदवण्यात आली. मात्र, ही आवक अपुरी पडल्यामुळे दरवाढ झाली आहे. विक्रेते आबासाहेब रायकर यांच्या म्हणण्यानुसार, “पावसामुळे भाज्यांचे दर वाढले असून, गावरान गवार आणि भेंडीच्या किमती विशेष वाढल्या आहेत.”
नवीन दरानुसार भाज्यांची स्थिती
- भेंडी: ₹६० वरून थेट ₹८० ते ₹१०० प्रति किलो.
- गवार: ₹१२० ते ₹१४० प्रति किलो.
- मटार: ₹१६० प्रति किलो.
- पडवळ व परवर: दर ₹१०० प्रति किलोवर पोहोचले.
- पालक जुडी: ₹४० ते ₹५० जुडी.
- शेतीत पाणी साचल्यामुळे रताळीची आवकही घटली आहे.
दरम्यान, मोशी बाजारात १८ हजार ५०० जुड्या कोथिंबीर आणि ५ हजार ७०० जुड्या मेथीची आवक झाली आहे. यासोबतच बाजारात सफेद ड्रॅगन फ्रूट आणि नागपूरची संत्री दाखल झाली असल्याची माहिती विक्रेते बालाजी सोमवंशी यांनी दिली. पालेभाज्यांची आवक ३७ हजार ५०० जुड्यांची असली तरी, वाढलेल्या मागणीपुढे ही आवक कमी पडत असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील भाजी आता महाग झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































