पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘एकला चलो रे’चा नारा? महायुती, महाआघाडीत बिघाडी?

17
Ekla Chalo Re slogan in PCMC
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 'एकला चलो रे'चा नारा?

Ekla Chalo Re slogan in PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे रणशिंग लवकरच फुंकले जाणार आहे. शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2017 मध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देत सत्ता काबीज केली होती. आता पुन्हा एकदा शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाआघाडीत बिघाडी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने मंडलाध्यक्षांच्या निवडी करून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे, तर इतर पक्षही पदाधिकारी निवडीवर भर देत आहेत. शहरातील राजकीय जाणकारांच्या मते, यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 78 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहर मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले आहे. मावळमध्ये शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे, तर शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ असून, दोन भाजपचे आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत. शहरात विधान परिषदेचे दोन आमदार असून, दोघेही भाजपचेच आहेत. त्यामुळे सध्या तरी महायुतीचे पारडे जड दिसत आहे.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनीही सर्व जागांवर भाजप स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुती आणि महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील राजकीय जाणकारांच्या मते, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, प्रत्येक पक्षाला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे