अनलॉकच्या पार्श्वभूमीवर जनतेने बिनधास्तपणा टाळावा -हर्षवर्धन पाटील

इंदापूर, दि. १ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचे इंदापूर शहर, जंक्शन येथे बुधवारी रुग्ण सापडले आहेत. तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण काळजी करणारे आहे. जनतेमध्ये अलीकडच्या काळात अनलॉकच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणा वाढल्याचे धोकादायक चित्र दिसून आहे.त्यामुळे आणखी संसर्ग वाढू नये म्हणून जनतेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना गांभीर्यपूर्वक सतर्कता बाळगावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे भीती बाळगण्याची गरज नाही, मात्र सध्या ‘अनलॉक ‘ ची प्रक्रिया चालू झाल्याने जनतेने अधिक सजग राहणे आवश्यक आहे. जनतेने सहकार्य केल्यास इंदापूर तालुका कोरोना मुक्त राहील,असा विश्वास देखील हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा.यामध्ये अपराधीपणाची, कमीपणाची भावना बाळगण्याची आवश्यकता नाही, उलट हे प्रशासनास सहकार्याचे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे चांगले काम आहे. नागरिकांनी शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा कोरोनाला हरविण्याचा सध्या एकमेव प्रभावी मार्ग आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार मार्फत देशातील ८० कोटी जनतेला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत ५ महिने प्रतिमहिना, प्रतिमाणसी ५ किलो गहू किंवा तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबास १ किलो डाळ मोफत देण्याचा घेतलेला निर्णय सध्याच्या कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या जनतेच्या आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय स्वागतार्ह आहे, असे मतही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा