नीरा बाजारात मास्क न वापरणाऱ्या लोकांना गांधीगिरी‌ करत‌ वाटले मास्क

पुरंदर, दि. १ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा येथील आठवडे बाजार दर बुधवारी भरला जातो. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा आठवडा बाजार सुरू करण्यात आला. मात्र या बाजारात लोक मास्कचा वापर करत नसल्यामुळे येथील आरोग्य कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत व पोलीस यांच्यावतीने गांधीगिरी करत लोकांना मास्क वाटून मास्क वापरण्याबाबत संदेश देण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील नीरा शहराचा आठवडी बाजार गेल्या काही दिवसापासून सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात सामाजिक अंतर राखले जात होते. लोकांची गर्दी कमी होती. मात्र आता लोकांच्या गर्दीचे प्रमाण वाढले आहे. बाजारात खरेदीला मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. मात्र येताना अनेक जण तोंडाला मास्क नलावताच येत आहेत. तर अनेक व्यापारी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे पुरंदर तालुका पत्रकार संघ, ग्रामपंचायत नीरा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस यांच्यावतीने गांधीगिरी करत लोकांच्या पाया पडून लोकांना मास्क वापरण्याबाबत जागृत करण्यात आले.

यावेळी पुरंदर पंचायत उपसमितीचे उपसभापती डॉ.गोरखनाथ माने, माजी उपसरपंच दीपक काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, शिवाजी चव्हाण ज्युबिलंट भरतीया फाऊंडेशनचे अजय ढगे, ज्युबिलंटचे जनसंपर्क अधिकारी ईसाक इनामदार, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, सदस्य भरत निगडे रामदास राऊत, पोलिस कर्मचारी सुदर्शन होळकर, निलेश जाधव, नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर आदी उपस्थित होते.

यावेळी बाजारात तोंडाला मास्क न लावता येणाऱ्या लोकांना मास्क देऊन त्यांना त्याचे महत्त्व पटवून देऊन झाले. अनेक व्यापारी व ग्राहकांनी हे मास्क यापुढे आपण लावणार असा विश्वास दिला. द जुबिलंट भारतीय फाउंडेशनच्यावतीने दोन हजार मास्क उपलब्ध करुन देण्यात आले होते.

यावेळी नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण म्हणाले की, आम्ही आत्ता जरी तुम्हाला मोफत मास्क देत असलो, तरी पुढील काळात जर कोणी बाजारपेठेत मास्क शिवाय दिसला किंवा थुंकला तर त्याला शासनाच्या नियमानुसार पाचशे रुपये दंड आकारला जाईल. त्यावेळी कोणाचीही हयगय केली जाणार नाही. कोरोना आजार होऊ नये किंवा तो पसरू नये म्हणून आपली व आपल्या समाजाचे काळजी घ्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा