इंदापूर, दि.२७ एप्रिल २०२०: देशात व राज्यात सव्वा महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या विरोधात लॉक डाऊनच्या माध्यमातून शासन व जनतेची एकजुटीने लढाई चालू आहे. मानवी जीवनात प्रथमच एवढ्या प्रदीर्घ काळाकरिता घरामध्ये थांबून व येणाऱ्या अडचणी सहन करून देशहितासाठी या लढाईत जनता देत असलेले योगदान खरोखरच प्रशंसनीय आहे. कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी येत्या दि.३ मेपर्यंत जनतेने धैर्य व सहनशीलता कायम ठेवणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (सोमवार) रोजी व्यक्त केले.
लॉकडाऊनची यशस्वी अंमलबजावणी केंद्र व राज्य सरकारने केल्याने कोरोना व्हायरसाचा संसर्ग हा ग्रामीण भागात होण्यापासून रोखण्यास चांगले यश मिळालेले आहे. त्यामुळे दि.३ मे नंतर ग्रामीण भागातील जनजीवन हे बऱ्यापैकी पूर्वपदावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या शहरी भागात कोरोनाचा संसर्ग दिसत असला तरी येत्या काही दिवसात तेथील संसर्ग कमी होऊन चांगली सुधारणा दिसेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, गेल्या महिन्यापासून लॉकडाऊनमुळे जनतेमध्ये नाही म्हंटले तरी काही प्रमाणात अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे. मात्र सकारात्मक विचार व आत्मविश्वासाच्या जोरावरती जनता त्यावर मात करीत आहे. भारतीय जनतेचे मनोबल उच्च आहे हे प्रत्येक संकटाच्या वेळी दिसून आलेले आहे. सध्या शेतकरी, मजूर, व्यवसायिक, कामगार आणि वाहतूकदार आदी समाजातील अनेक घटक सध्या अडचणीत आलेले आहेत. त्यांना दिलासा देणारे निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. तसेच लवकरच दैनंदिन व्यवहार सुरु झाल्यावर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. परिणामी, सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीतून जनता निश्चितपणे बाहेर पडेल,असा विश्वासही माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
आपल्या कुटुंबातील वृद्धांची अधिक काळजी घ्यावी, जनतेने दाखविलेली एकजूट आगामी काळातही कायम ठेवून एकमेकांना सहकार्याची भूमिका पुढे चालु ठेवावी. जनतेने कोरोना व्हायरसच्या विरोधात दिलेले योगदान हे कौतुकास्पद आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही आणखी काही महिने मास्कचा वापर करून सोशल डिस्टनन्सिंगचे काटेकोरपणे पालन आपणास करावे लागणार आहे.
सध्या शासनाने दिलेल्या सूचनांची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, घरामध्ये सुरक्षितपणे थांबण्याच्या आवाहनास जनतेकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. या संकटावर आपण शंभर टक्के यशस्वीपणे मात करणार आहोत, असा दिलासाही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे