नवी दिल्ली, दि. २२ जून २०२० : गलवानमध्ये १५ जून रोजी चीनी सैनिकांसह झालेल्या चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारने सैन्याला मोकळीक दिली आहे. जर सीमेवरील चीनी सैनिक भारतीय सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असतील तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला आता शस्त्रांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने संभाव्य धोका निर्माण झाल्यास सैन्याला गोळीबार करण्यास परवानगी दिली आहे. एलएसीवर २० सैनिकांच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर सातत्याने सैनिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. याची खबरदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या एका करारानुसार प्रत्यक्ष संरक्षण रेषेवर उभय देशातील सैन्याने कोणतेही शस्त्र घेऊन थांबणार नाहीत असे ठरले होते. परंतु चीनने केलेल्या या कृत्यानंतर आता हे प्रोटोकॉल पाळणे सैनिकांच्या जीवावर बेतले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता चीनी सैनिकांकडून असे प्राणघातक हल्ले केले गेल्यास कोणतेही प्रोटोकॉल्स पाळले जाणार नाहीत व त्याचे प्रत्युत्तर शस्त्रांच्या स्वरूपानेच दिले जाईल. यामध्ये भारतीय सैन्याला आता गोळीबारी करण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे
१५ जून रोजी झालेल्या हिंसक चकमकीमध्ये चीनी सैन्याने लोखंडी रॉड तसेच दगडांचा वापर केला होता. विशेष म्हणजे या लोखंडी रॉडवर काटेरी तारा देखील गुंडाळल्या गेल्या होत्या. चीनने प्रत्यक्षात गोळी झाडली नसली तरी अशा घातक हत्यारांचा वापर केला होता. रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन सैन्यांचे लष्करी प्रमुख आणि संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी बैठक बोलावली. या बैठकीत एलएसीच्या वास्तविक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि सैन्याच्या तयारीवरही चर्चा करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी