त्या यंत्रणांना पेट्रोल , डिझेल पुरविण्यात यावे: जिल्हाधिकारी राम

पुणे, दि.६ मे २०२०: लॉकडाऊनच्या काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासुन लागू करुन खंड २, ३, ४ मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावलीही प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे.

कोविड-१९ विषाणूच्या साथ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून गृह सचिव आणि अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारी समिती, भारत सरकार, यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा संपूर्ण देशभरात मार्गदर्शक सूचना, आदेश लागू केलेले आहेत.

या अनुषंगाने नागरिकांची गर्दी होवू नये आणि परस्पर संपर्क होवून संसर्ग वाढू नये याकरिता जमाबंदी आदेश लागू केलेले आहेत. लॉकडाऊनच्या आदेशास दि.१७ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, पुणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अत्यावश्यक व इतर सेवा सवलतीकरिता वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास तसेच शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र/ पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड तसेच जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अत्यावश्यक व इतर सेवा सवलतीकरिता वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास तसेच शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र/ पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात यावा.

पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद हद्दीमध्ये आयुक्त, पुणे महानगरपालिका, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्त, पुणे शहर व पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मुख्य कार्यकारी अधिकारी छावणी परिषद व जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अत्यावश्यक व इतर सेवा सवलतीकरिता वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास तसेच शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र/ पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशित केले आहे.

पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक व इतर औद्योगिक आस्थापना, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्याताभिमुख युनिट, कच्चा माल वाहतूक, वाणिज्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हार्डवेअर उत्पादन आणि पॅकेजिंग, ग्रामीण भागातील बांधकाम संबंधित आस्थापना, सर्व शासकीय यंत्रणा, सर्व मान्सूनपूर्व कामे सुरु असलेली आस्थापना तसेच सर्व आस्थापनाशी संबंधित सर्व प्रकारच्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे पासेसची मागणी न करता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे (सोशल डिस्टन्सिंग, मास्क ) पालन करुन पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल देण्याची दक्षता घ्यावी. तसेच यापूर्वी पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्याबाबत दिलेले आदेश निरंतर ठेवण्यात येत आहेत. या आदेशाची अंमलबजाणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा