पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, काँग्रेसचे आज आंदोलन

मुंबई, दि. २९ जून २०२०: देशामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. परिणामी त्याचा प्रभाव पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर देखील होत आहे. इंधनाच्या दरामध्ये हे सातत्याने वाढ होत असल्याने काँग्रेसने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. त्यातच आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनांच्या दरांमध्ये वाढ होत असताना काल रविवारी इंधनाच्या दरामध्ये कोणतीही वाढ न झाल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु हा दिलासा फारसा काळ टिकला नाही. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२ रुपये १० पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये ६४ पैसे झाला आहे. चेन्नईत सोमवारी पेट्रोलचा दर ८३ रुपये ६३ पैसे झाला असून डिझेल प्रतिलिटर ७७ रुपये ७२ पैशांना मिळत आहे. दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडाबद्दल बोलायचं गेल्यास सोमवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१ रुपये ८ पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७२ रुपये ५९ पैसे झाला आहे. तर गुरुग्राम येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८ रुपये ६४ पैसे असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ७७ पैशांना मिळत आहे. गाजियाबादमध्ये सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपये ९५ पैशांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ४४ पैशांना मिळत आहे.

काँग्रेस करणार राज्यव्यापी आंदोलन

विशेष म्हणजे कोविड -१९ मुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या होत्या. असे असताना देखील भारतातील इंधनाचे दर हे कायम आहे त्याच किमतींवर होते आणि आता जवळपास एक महिन्यापासून सातत्याने त्यांच्या दरांमध्ये देखील वाढ होत आहे. हे लक्षात घेता काँग्रेस आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली होती. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत, या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा