पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन जिकीरीचे प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून शासनाने संचारबंदीही लागू केली आहे. मात्र तरीही काही व्यक्ती रस्त्यांवर, पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. यावर तोडगा म्हणून पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच फक्त पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. यामध्ये पोलिस, फार्मासिस्ट, डॉक्टर तसंच पत्रकार हे समाविष्ट आहेत. तसे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले आहे.
कोणाला पेट्रोल मिळणार:
अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी.
करोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.
अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती.
वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.
विशेष म्हणजे या चारही प्रकारच्या व्यक्तींनी पेट्रोल भरताना एकदाच गाडीची टाकी पूर्ण घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यानंतर राज्यातील इतर भागात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारनं साथरोग प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला. त्याचबरोबर गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत आहेत.