नवी दिल्ली, २ मार्च २०२१: सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरातील ऐतिहासिक विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. तेलाच्या किंमती १६ पटीने वाढल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे, तर विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. अश्या परिस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनाचे दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.
इंधनाच्या किमती मार्च एप्रिल पर्यंत कमी होऊ शकतात असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, भारत हा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे भारताने रशिया, कतार आणि कुवैत सारख्या तेल उत्पादक देशांवर तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी दबाव आणला आहे. जेव्हा तेलाचे उत्पादन वाढेल तेव्हा प्रति बॅरलची किंमत कमी होईल आणि नंतर किरकोळ तेलाची किंमतही कमी होईल.
खराब हवामानामुळे अमेरिकेतील उत्पादन गेल्या दोन-तीन आठवड्यांत मंदावले आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर परिणाम झाला. जेव्हा हिवाळा संपेल तेव्हा किमती देखील खाली येतील. वाढत्या मागणीमुळे हिवाळ्यात किमती गगनाला भिडल्या आहेत. येत्या काही दिवसांत किमती कमी होतील.
प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, त्यांचे मंत्रालय जीएसटी कौन्सिलला पेट्रोलियम पदार्थांना त्याच्या कक्षेत समाविष्ट करण्याची विनंती करत आहे, कारण त्याचा फायदा लोकांच्या हितासाठी होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही असे संकेत दिले होते. जीएसटी कौन्सिलने पेट्रोलियम मंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी केल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निम्म्यावर आणल्या जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे